सोलापूर - गुन्ह्यातील आरोपीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकांना शिवीगाळ केल्याचा प्रकार सोलापुरात समोर आला. यावेळी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि ड्युटीवर असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजीवनी संगेश व्हट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शकीला हफिस शेख,दानिया हफिस शेख,जोनिया हफिज शेख,जबेरिया हफिस शेख व हफिस शेख (सर्व.रा.शिवाजीनगर मोदीखाना,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर मोदीखाना या पत्त्यावर गुन्ह्यातील संशयित आरोपी हफिस शेख याच्या पत्त्यावर शोध घेण्यासाठी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे गेले होते. यावेळी हफिस शेख यांना का शोधत आहे. असे म्हणत शेख यांच्या कुटुंबीयांनी धमकी देत मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ केली. त्यानंतर दानिया शेख हिने फिर्यादी यांच्या अंगावर धावून येऊन बोचरून पायाने लाथ मारल्या. तसेच महिला पोलीस हवालदार माडयाळ यांना शिवीगाळ करून लाथ मारून फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे.असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोसई.बनकर हे करीत आहेत.