मोहोळ : ईव्हीएम मशीन हे ॲपच्या माध्यमातून हॅक करत असल्याच्या संशयावरून मोहोळ येथील नागरिकांनी दोन परप्रांतीय तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. १४ मोबाईलवरून संशयास्पद छेडछाड करणाऱ्या दोन तरुणांना १४ मोबाईलसह अटक करण्यात आले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागणाऱ्या घटना घटल्या, मात्र मोहोळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदान प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन ॲपच्या माध्यमातून हॅक करत असल्याच्या संशयावरुन दोन परप्रांतीय तरुणांना नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून १४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
या संदर्भात मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी मतदान यंत्र हॅक करण्याच्या विषयाची तक्रार पोलिसात दिली आहे. या तक्रारीमध्ये मोहोळ शहरात २१ तारखेला मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास एक बिगर नंबरची मोटरसायकल व १४ मोबाईल एकाच वेळी ऑन करून कुठल्यातरी ॲपवरून मतदान मशीनला छेडछाड करण्याचा संशय असल्याने यांची चौकशी व्हावी व कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी पोलीसांकडे केली आहे.
मतदारसंघात झालेल्या मतदानाची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून यामध्ये मत मोजणीच्या १४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. असे असताना संशयितांकडे १४ च मोबाईल सापडले आहेत. आणि विशेष म्हणजे ते १४ मोबाईल एकाच वेळी ऑन असल्याचेही बारसकर यांच्या निदर्शनास आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे १४ मोबाईल एकाच वेळी ऑन करुन ठेवण्याचे कारण काय ? असा संशय आल्याने या संदर्भात परप्रांतीय तरुणांचे हे कृत्य संशयास्पद वाटते. त्यामुळे या घटनेची सखोलचौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी बारसकर यांनी केली आहे. या संदर्भात मोहोळ पोलिसांची संपर्क साधला असता मोहोळ पोलीस स्टेशन मधील गुप्त विभागात कसून चौकशी सूरु आहे. या चौकशीनंतर संबंधितावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे मोहोळ पोलीस ठाणे अंमलदार सोनवणे यांनी सांगितले.