पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे व त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या दहाव्या दिवशी आंदोलकांची प्रकृती ढासळत चालली आहे. सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व अंतिम निर्णय घेण्यासाठी राज्यभरातील धनगर समाजाची बैठक शुक्रवारी (दि. 20) पंढरपुरात घेण्यात येणार आहे. या बैठकीस धनगर समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी फक्त झुलवत आहे. त्यामुळे आम्ही आता शासनाच्या निर्णयाची वाट पाहणार नाही असे त्यांनी सांगितले. आंदोलनकर्ते पांडूरंग मेरगळ म्हणाले, सरकारने सात दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, आम्ही गाफील न राहता आंदोलनावर ठाम आहोत. माऊली हळणवर म्हणाले, आंदोलनाचा दहावा दिवस आहे. सरकार आमच्याबाबत संवेदनशील दिसत नाही. मी घरी सांगून आलो आहे, त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. समाजाने आंदोलकांची ताकद वाढवावी.