Solapur Youth festival: युवा महोत्सवात सर्जनशीलतेचा जल्लोष

युवा महोत्सवात दुसर्‍या दिवशीही मोठी रंगत; सांगोल्यात युवाशक्तीचे दर्शन
Solapur Youth festival: युवा महोत्सवात सर्जनशीलतेचा जल्लोष
Published on
Updated on

भारत कदम

सांगोला : अविष्कार प्रबोधन रंग, ताल, कला आणि ऊर्जेचा संगम असलेल्या युवा महोत्सवाला दुसर्‍या दिवशीही मोठी रंगत आली. कलाकारांचा अभिनय व त्यासाठी देण्यात येणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद यामुळे या महोत्सवाला नवऊर्जा प्राप्त झाली आहे. परंपरेचा ठसा आणि आधुनिकतेचा तडका, असे उत्साही वातावरण गेले दोन दिवस सांगोला येथील सांगोला महाविद्यालयामध्ये होते.

महाविद्यालयाच्या परिसरात उभारलेल्या मुख्य रंगमंचासह चार उपरंगमंचांवर लावणी, समूहगायन, भारतीय कातरकाम, प्रश्नमंजूषा, उत्कृष्ट मराठी, भारूड, भित्तिचित्र, काव्यवाचन, एकांकिका, मेहंदी आणि भजन अशा विविध कलाप्रकारांनी गेली दोन दिवस रंगतदार पद्धतीने सादरीकरण झाले. विविध मंचांवर सर्जनशीलतेचा जल्लोष तर सभोवताली उत्साहाची उधळण पाहायला मिळाली. दिवसभर शहरात तरुणांच्या आनंदाचा, कलांचा आणि उमेदचा महोत्सव अनुभवायला मिळाला.

गेल्या काही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सांगोल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे यजमानपद लाभले आहे. 21 व्या युवा महोत्सवाला सांगोला महाविद्यालयाच्या मैदानावर रंगत आली आहे. सांगोला महाविद्यालयामधील भव्य असे पटांगण विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी करण्यात आलेली भोजनव्यवस्था तसेच राहण्याची सोय प्रशंसनीय ठरली. विशेषतः विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि सुरक्षिततेबाबत सहभागी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालय परिसरातील आकर्षक सेल्फी पॉइंट्सवर विद्यार्थ्यांचा उत्साही माहोल आहे. आपापल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करत कला सादरीकरणात गुंतलेले विद्यार्थी, ढोलकीचा नाद, घुंगरांचा ताल आणि उत्साहाने भरलेले वातावरण सांगोल्यातील युवाशक्तीचे दर्शन घडवत आहे.

रंगमंचावर कला सादर करण्यापूर्वी महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये ठिकठिकाणी विविध ठिकाणाहून आलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पूर्व सादरीकरण करतानाचे चित्र दिसत होते. तसेच कलाकार, विद्यार्थी समूहासमूहाने एकमेकांशी विचार विनिमय करतानाचे दिसत होते.

गेले दोन दिवस सांगोला महाविद्यालयाचे पटांगण व विविध रंगमंच याठिकाणी विद्यार्थी, कलाकार, शिक्षक, प्रशिक्षक, प्रेक्षक यांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे महाविद्यालय परिसर फुलून गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news