

सोलापूर : शहरातील विजापूर रोड परिसरातील जाई जुई नगर येथील साई श्रद्धा अपार्टमेंटमधील समर्थ ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात तीन अज्ञात इसम जबरदस्तीने घुसले. दमदाटी करीत हातातील कोयत्याने दुकानातील काच फोडून दहा हजारांचे नुकसान केले. याप्रकरणी दिपक दिगंबर वेदपाठक (वय 63) यांनी रविवार रोजी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे.
समर्थ ज्वेलर्सच्या दुकानात कोणीही गिऱ्हाईक नसल्याचे पाहून निळ्या रंगाच्या मोटरसायकल वरून आलेले तीन अज्ञात तरुण दुकानात घुसले. एकाच्या हातात बनावट पिस्टल, दुसऱ्याच्या हातात कोयता व तिसऱ्याच्या हातात चाकू होता.
हे तिघे काऊंटरवर बसलेल्या मालकाजवळ गेले. मुकाट्याने तुझ्या दुकानातील दागिने काढून दे, असे म्हणत हातातील कोयता टेबल वरील काचेवर जोरात मारला. दहा हजार रूपये किंमतीच्या काचेचे नुकसान केले. जबरदस्तीने दुकानातील सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. पण दुकानाचे मालक व अन्य कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातल्याने तिघेही पळून गेले.
विजापूर रोडचा परिसर आणि विजापूर नाका पोलिस ठाणे यातील अंतर कमी आहे. पोलिस ठाणे जवळ असतानाही चोरट्यांनी सोन्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी एवढे धाडस केलेच कसे, असा प्रश्न उद्भवत आहे.