

महूद : मोटारसायकलवरून कुटुंबासमवेत गावाकडे निघालेल्या तरुणाच्या पाठीत लोखंडी सत्तूरने मारून जखमी करत त्याच्या पत्नीच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मनी गंठण अज्ञात तीन चोरट्यांनी हिसकावून नेले आहे. ही घटना मंगळवार, (दि. 14) रोजी कटफळ (ता. सांगोला) गावाच्या शिवारात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
महूद परिसरात अशा घटना वारंवार घडत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणखी एक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत खवासपूर (ता. सांगोला) येथील वैभव अर्जुन ढेरे यांनी सांगोला पोलिसात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, मंगळवार (दि. 14) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला वैभव ढेरे, त्यांची पत्नी स्वाती, मुलगा विराज असे तिघेजण मोटारसायकल क्र.(एम.एच.45 ए.व्ही.0642) वरून खवासपूर या आपल्या गावी निघाले होते.
कटफळ गावच्या शिवारात दुधाळवाडी पाटी ते लांडा महादेव मंदिर रस्त्याने वनीकरण क्षेत्राच्या बाजूला रस्त्यावर आले असताना त्यांच्या पाठीमागून एक होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्र.(एम.एच.11 डी.एम.9986) यावरून तीन अनोळखी व्यक्ती आले. त्या गाडीवर मध्ये बसलेल्या इसमाने त्याच्या हातातील लोखंडी सत्तूरने वैभव ढेरे यांच्या उजव्या बाजूला मारून जखमी केले. त्याचवेळी गाडीच्या पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांची पत्नी स्वाती हिच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण हिसकावून घेतले. शिवीगाळ आणि दमदाटी करत हे तिघेजण मोटारसायकलवरून पसार झाले. या तीन अनोळखी व्यक्तींविरोधात वैभव ढेरे यांनी सांगोला पोलिसात गुन्हा नोंदविला आहे.
महूद परिसरातील लक्ष्मीनगर, लोटेवाडी रोडवर अशाप्रकारे अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत पोलिसांनी योग्य तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.