

सोलापूर : शासकीय दोन वसतिगृह आणि दोन निवासी शाळांवर सौर ऊर्जा प्रकल्प नव्याने बसवून तीन वर्षे झाली तरी तो अद्याप कार्यान्वित करण्यात आलेला नाही. तो प्रकल्प सुरू करण्यासाठी नेमकी काय अडचण आहे, याचाही पत्ता त्या खात्याच्या वरिष्ठांनाही नाही. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज बिलांत सेव्हींग व्हावे, या शासनाच्या उद्देशालाच यामुळे हरताळ फासला गेला.
विशेष म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्पाचे अकरा युनिट पूर्णतः कार्यान्वित करण्याअगोदरच सर्व रक्कम संबंधित कंपनीस देण्यात आल्याचीही माहिती पुढे आली. यामुळे या प्रकारातील दोषी तत्कालीन व विद्यमान अधिकारी, कर्मचार्यांना निलंबित करत संबंधित कंपनीला काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये, अशी विचारणा होत आहे.
दरम्यान, याविषयी सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे-महाडिक यांच्याशी ‘पुढारी’प्रतिनिधीने थेट संपर्क साधला असता, त्यांनी शासकीय छापात उत्तर दिले. त्या म्हणाल्या, शासकीय वसतिगृहासह निवासी शाळा व सामाजिक न्याय भवन इमारतीवर बसवलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत मी कार्यालयीन माहिती घेऊन बोलेन. नावीन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण या योजनेंतर्गत अनुसूचित जाती उपाय योजनेतून मंजूर असलेल्या पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत नऊ वसतिगृह आणि दोन निवासी शाळा अशा अकरा ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शासनाने 99 लाख 48 हजाराचा निधी मंजूर केला.
कामाच्या विविध टप्प्यावर तो निधी संबंधित यंत्रणांना वितरितही करण्यात आला. त्या अकरापैकी दोन निवासी शाळा व दोन वसतिगृह अशा चार ठिकाणी नवीन सोलार यंत्रणा बसवण्यातही आली. त्यास आता तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्याप ती यंत्रणा कार्यान्वितच झालेली नाही. यामुळे तो प्रकल्प विविध संस्थांच्या छतावर अक्षरशः धूळखात पडून असून शासनाचा कोट्यवधींचा निधी वाया गेल्यासारखी परिस्थिती आहे.
संबंधित कंपनीकडून वसतिगृह, सामाजिक न्याय भवनसह 11 वेगवेगळ्या ठिकाणी सौर प्रकल्प बसवण्यात आला. त्यापैकी सहा ठिकाणचे प्रकल्प 2020-21 मध्ये सुरू झाले. गेल्या महिन्यापासूनच सामाजिक न्याय भवनच्या इमारतीवरील सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाला आहे. मात्र, अद्याप दोन निवासी शाळा व दोन वसतिगृहात ही यंत्रणा कार्यान्वितच नाहीत. यामुळे वीज बिलापोटी शासनाला दरमहा लाखोंचा भूदंड सहन करावा लागत आहे.
येथेही कार्यान्वितच नाही
सोलापुरातील नेहरूनगर येथील मुलांचे वसतिगृह, अक्कलकोट येथील अनुसूचित जाती निवासी शाळा व वसतिगृह, नजीक पिंपरी (ता. मोहोळ) येथील निवासी शाळा याठिकाणी 2022 मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला आहे. मात्र तोही अद्यापपर्यंत म्हणजे तब्बल तीन वर्षे झाली तरी कार्यान्वित करण्यात आलेला नाही.