

सोलापूर : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे व त्यामुळे सीना नदीला आलेल्या पुराने महावितरण सोलापूर मंडळ अंतर्गत जेऊर, माढा, करमाळा, मोहोळ, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात नदीकाठावर असलेल्या गावात व शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा करणार्या महावितरणच्या लघुदाब उच्चदाब व रोहित्र पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वीज पुरवठा दि. 22 सप्टेंबरपासून पूर्णतः खंडित होता. बाधित एकूण 95 गावांपैकी 88 गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.
या गावांना वीज पुरवठा करणार्या 11 केव्ही वाहिन्या यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बर्याच ठिकाणी पर्यायी उपकेंद्र व वाहिनी यांच्या साहाय्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. देखील माढा तालुक्यातील वाकाव, कुंभेज, खैराव व सुलतानपुर तसेच मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी व मुंढेवाडी ही गावे दि. 2 ऑक्टोबरपर्यंत अंधारात होती. माढा तालुक्यातील वाकाव कुंभेज, खैराव या गावांना मानेगाव उपकेंद्रातून नवीन 22 पोलची 11 केव्ही वाहिनी उभारून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
त्याचप्रमाणे दारफळ सीना या गावाला बीज पुरवठा करण्याकरिता 12 तासांत नवीन रोहित्राची उभारणी करून वीज पुरवठा सुरू करण्यात आला. सुलतान पूर या गावास वीज पुरवठा करणारी जुनी 11 केव्ही वाहिनी नदीच्या पुरात पुर्णपणे वाहून गेल्याने व नवीन वाहिनी आहे. त्या ठिकाणी उभी करण्यासारखी परिस्थिती नसल्याने निमगाव उपकेंद्रातून 42 पोलची नवीन 11 केव्ही वाहिनी उभारून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
केबल टाकून वीज पुरवठा सुरक्षित
मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी व मुंढेवाडी या गावांना वीज पुरवठा करणारी 11 केव्ही वाहिनी नदीच्या पाण्यात असल्याने नवीन 12 पोलची 11 केव्ही वाहिनी व मुंढेवाडी रेल्वे स्टेशनजवळ 200 मीटर 11 केव्ही क्षमतेची भूमिगत केबल टाकून युद्ध पातळीवर काम पूर्ण करण्यात आले. तसेच पासलेवाडी गावास देखील नवीन 12 पोलची 11 केव्ही वाहिनी टाकून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.