

बार्शी : महिलेच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणानेे स्वतःच्या शेतामधील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील खडकलगाव येथे घडली.
सोमनाथ सुरेश रोंगे (वय 35, रा. खडकलगाव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ज्योती ऊर्फ सोनी संजय गव्हाणे (रा. खडकलगाव, ता. बार्शी) असे मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मयताचे वडील सुरेश रंगनाथ रोंगे (रा. खडकलगाव, ता. बार्शी) यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातीलच ज्योती ऊर्फ सोनी संजय गव्हाणे हिने वेळोवेळी सोमनाथ रोंगे यास माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला पैसे आणून देत जा, माझ्याकडे नेहमी येत जा, तू जर मला सोडून गेलास तर तुझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनला खोटी तक्रार देते, असे म्हणून त्याच्याशी नेहमी वारंवार भांडण करून त्यास मानसिक त्रास दिला.
ज्योती हिने मुलगा सोमनाथ याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे करत आहेत.