सोलापूर : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. पण पंढरपूरला जाणाऱ्या रेल्वेची संख्या तोकडी आहे. पंढरपूर-मिरज मार्गावर दुपारी तीन वाजता परळी-मिरज एक्स्प्रेस गेल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल १७ तास एकही प्रवासी गाडी नाही. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची अडचण होत आहे. त्यामुळे या मार्गावर कुडूवाडी-पंढरपूरवरून संध्याकाळी मिरजसाठी डेमू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मिरज, कोल्हापूरच्या प्रवाशांकडून सकाळच्या सत्रात कोल्हापूर- कलबुर्गी-कोल्हापूर गाडी चालू करावी, अशी मागणी होत आहे. पंढरपूर येथे दररोज हजारो भाविक येतात. त्यांना अक्कलकोट, गाणगापूर, कोल्हापूरला जाण्यास अजून एक गाडी उपलब्ध होईल तसेच पंढरपूर-मिरज मार्गावर असलेला १७ तासांचा गॅप भरुन निघेल. सोलापूरकरांना दुपारच्या सत्रात कोल्हापूरसाठी गाडी उपलब्ध होईल.
- पियुष संगापूरकर, प्रवासी
दरम्यान, सोलापूर तसेच आसपासच्या भागांतून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. एका दिवसात पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊन येणारे भाविक खूप आहेत. पण त्यांना गाडी नसल्याने त्याठिकाणी थांबावे लागते. यामुळे पंढरपूर-मिरज मार्गावर डेमू सुरू करण्याची मागणी भाविक आणि प्रवाशांमधून होत आहेत. तसे झाल्यास मिरज, सांगोला, जत, ढालगाव, कवठे महाकाळ कोल्हापूर, सांगलीला परत जाणाऱ्या भक्तांची सोय होणार आहे.
कुडूवाडी स्थानकावरून दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी परळी- मिरज डेमू गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ ते साडेनऊच्यादरम्यान रेल्वेगाड्या आहेत. या वेळेदरम्यान कोणतीही सोयीस्कर रेल्वे पंढरपूर-मिरजकडे जाण्यासाठी नाही. त्यामुळे अनेक भाविकांना व मिरज-कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना रस्तेमागनि वेळखाऊ प्रवास करावा लागतो. संध्याकाळच्यावेळी कुडूवाडीहून पंढरपूर-मिरजकडे रेल्वेगाडीची आवश्यकता आहे. कुडूवाडीहून पंढरपूर-मिरजकडे रेल्वेगाडी सुरू केल्यास प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल. सोलापूर विभागाला मोठे प्रवासी उत्पन्न मिळण्यास मदत होईल.
- कनिष्क बोकेफोडे, रेल्वे अभ्यासक