

बार्शी : तालुक्यातील कुसळंब शिवारात एकाच रात्रीत तब्बल आठ शेतकर्यांच्या लाखो रुपयांच्या पाणबुडी मोटारी चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
संजय ठोंगे (वय 51 रा.कुसळंब) या शेतकर्याने याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यात म्हटले आहे की, त्यांची कुसळंब ते आगळगाव या रस्त्यावर शेती आहे. मे महिन्यात पाऊस झाल्याने शेतातील विहिरीला पाणी आले आहे. त्यामुळे त्यांनी शेतातील विहिरीत पाणबुडी मोटार सोडली होती. गुरुवारी सायंकाळी ते शेतातून घरी गेले होते.
आज सकाळी ते शेतात पिकास पाणी देण्यासाठी गेले असता पाणबुडी मोटार दिसून आली नाही. त्यांच्या बरोबरच कुसळंब शिवारामधील नागनाथ ठोंगे, विकी शिवाजी ठोंगे, वसंत दगडू ठोंगे, अक्षय हरीभाऊ उकीरंडे, नंदा अनिल शिंदे, दीगंबर चक्रधर काशिद, शकुंतला कालीदास काशिद या शेतकर्यांच्याही शेतातील विहिरीमधील पाणबुडी मोटारी चोरट्याने चोरून नेलेल्या आहेत. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटारी पुरवलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने शेतात भेटी देऊन पाहणी केली.