

मोहोळ: तालुक्यातील सावळेश्वर येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेने दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि तत्काळ व प्रभावी वापरामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल ११ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचला. या यशाबद्दल मोहोळचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी 'ग्रामसुरक्षा यंत्रणेचा' प्रभावी वापर तालुक्यातील सर्व गावांनी करावा, असे आवाहन केले आहे.
मंगळवारी (दि. १४) दुपारी दीडच्या सुमारास सावळेश्वर येथील कैलास गुरव आणि धनाजी नीळ यांच्या उसाला अज्ञात कारणाने अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच गावचे पोलिस पाटील चंद्रकांत गुंड यांनी कोणतीही वेळ न दवडता ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (१८००२७०३६००) क्रमांकावरून ही माहिती तातडीने संपूर्ण गावाला कळवली. यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे अवघ्या काही क्षणातच अनेक ग्रामस्थ मदतीसाठी घटनास्थळी धावले. उपस्थित गावकऱ्यांच्या मदतीने उसाला लागलेली आग यशस्वीरित्या आटोक्यात आणण्यात आली, ज्यामुळे उर्वरित ११ एकर ऊस वाचविण्यात यश आले.
सावळेश्वरचे सरपंच सखाराम साठे, ग्रामपंचायत सदस्य दादाराव लांडगे आणि पोलिस पाटील गुंड यांच्या प्रयत्नातून गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबविली जात आहे. नागरिकांना कॉल स्वरूपातील मेसेज तत्काळ ऐकवला गेल्याने सीताराम गुंड, राजू टेकाळे, तानाजी टेकाळे, सत्यवान चटके, विलास गावडे, जीवन लांडगे, शौकत शेख आणि संपूर्ण नीळ कुटुंब यांच्यासह सर्व नागरिकांनी आग विझवण्यासाठी मोलाची मदत केली. त्यांच्या या एकजुटीमुळे ग्रामसुरक्षा यंत्रणेचे विशेष कौतुक होत आहे.
मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळेश्वर गावात विविध सूचना देण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा आतापर्यंत ६८ वेळा वापर करण्यात आला आहे. जिल्हा ग्रामीण पोलीस दल आणि जिल्हा परिषद सोलापूर यांचा हा संयुक्त उपक्रम असून, या यंत्रणेत जिल्ह्यातील १०३० गावांमधील ११.६१ लाख नागरिक सहभागी आहेत. आजवर संपूर्ण जिल्ह्यात या यंत्रणेचा १९ हजार २४७ वेळा यशस्वी वापर करण्यात आला आहे.