

सोलापूर : अतिवृष्टी, पुरामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा उभा राहावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 हजार 628 कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. ती मदत दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र, दिवाळी दोन दिवसांवर आली तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे ‘मुख्यमंत्री साहेब पूरग्रस्तांना केव्हा मदत मिळणार’, असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. त्या मदतीकडे जिल्ह्यातील चार लाख 69 शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 4 लाख 69 हजार 306 शेतकरी तर 4 लाख 29 हजार 61 हे. आर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये आठ तालुक्यातील 115 गावांचा समावेश आहे. त्यांना दिवाळीपूर्वी जाहीर केलेली रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. परंतु, दिवाळी अवघ्या दोन दिवसावर आली असून, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्यातील 29 जिल्ह्यातील 253 तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 68 लाख 69 हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे तसेच नदीकाठील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली आहे. मात्र, त्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली नाही. त्या मदतीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बी-बियाण्यांसाठीही मदत
बियाणे आणि इतर कामांसाठी प्रति हेक्टर 10 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांना 18 हजार 500 रुपये हेक्टरी, हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना 27 हजार प्रति हेक्टरी, बागायती शेतकऱ्यांना 32 हजार 500 हेक्टर मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. त्यांना 17 हजार प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे, अशी मदत जिल्ह्यासह राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे.