सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी (दि. 23) धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन केले आहे. याशिवाय आमदार व खासदारांच्या घरासमोर हलगी आंदोलनही पुढील एक-दोन दिवसांत करण्यात येणार आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी पंढरपूर येथे मागील 13 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मागील दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व धनगर समाजबांधवांची पंढरपूर येथे
बैठक होऊन त्यामध्ये राज्यभर रास्ता रोको आंदोलन व आमदार, खासदारांच्या घरासमोर हलगीनाद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर सोलापूर शहराजवळ धनगर समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. पक्षभेद विसरुन सर्वच समाजबांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. सोलापूर शहराजवळ केलेल्या रास्तारोको मध्ये भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, पाथरीचे माजी सरपंच श्रीमंत बंडगर यांच्यासह विविध पक्षातील समाजबांधव उपस्थित होते.