

बार्शी : आरडाओरडा करू नका, असे म्हटल्याचा राग मनात धरून चौघांनी मिळून दोघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बार्शीत घडला. शिवम माने, सार्थक रवींद्र देवकते व त्यांचे दोन मित्र अशी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
संतोष भारत देवकर (वय 35, रा. भराडीया प्लॉट, अलिपूर रोड) यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पहाटे साडेपाचच्या सुमारास ते व त्यांचा भाऊ सूरज कारमधील किराणा माल खाली उतरवीत होते. त्यावेळी शिवम माने मोठ्याने हार्न वाजवीत त्याठिकाणी आला. त्यावेळी देवकर बंधू त्यास पाच मिनिटे थांब असे म्हणताच शिवमने शिवीगाळ करून तुझ्या बापाचा रस्ता आहे काय असे म्हणून जोरात बोलून दमदाटी सुरू केली.
शिवम याचे वडील बापू आणि त्याची आईही त्या ठिकाणी आले. त्यांच्यात आपआपसात चर्चा होऊन भांडण मिटले होते. त्यानंतर सायंकाळी शिवम माने हा लोखंडी गज घेऊन व सोबत सार्थक रवींद्र देवकते व त्याचे दोन अनोळखी मित्र घेऊन देवकतेंच्या घरासमोर शिवीगाळी करू लागला. देवकते बंधूंनी घराबाहेर येऊन त्यांना शिवीगाळी करून आरडाओरडा करु नका असे म्हणताच, सार्थक व त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी मित्रांनी लाथाबुक्यांनी मारण्यास सुरुवात केली त्यावेळी शिवम माने याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने डोक्यात मारले.
भांडणे सोडविण्यास भाऊ सुरज आला असता त्याला देखील सर्वांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यास आलेल्या आई, पत्नी, भावजय यांनाही शिवीगाळी करून ढकलून दिले. पुढे पोलिसांत तक्रार देण्यास गेल्यावर जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.