

सोलापूर : जुळे सोलापुरातील कोटणीस नगर व विशाल नगर येथे भर दिवसा झालेल्या वेगवेगळ्या चोरीच्या घटनेतील दोघा आरोपींना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घटनास्थळावरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास केला. सपोनि खेडकर व त्यांच्या तपास पथकाने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी चोरी केल्याची खात्री झाली. आरोपी सूर्यकांत ऊर्फ चिन्या अनंत माने (वय 34, रा. मोरया हौसींग सोसायटी, वेताळ नगर, चिंचवड ), दुसरा आरोपी राम ऊर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय-35, रा. मु.पो. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव ) अशी त्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने, 62 तोळे चांदीचे दागिने वस्तू व गुन्ह्यात वापरलेली दुचाकीसह एकूण तीन लाख 15 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
चोरीची पहिली घटना कोटणीस नगरात 24 सप्टेंबर रोजी घडली होती. रेखा कैलास चौधरी (वय 38, रा. अंबिका रेसिडेन्सी, कोटणीस नगर ) यांनी विजापूर नाका पोलिसांत सदर चोरीच्या घटनेबाबत फिर्याद दिली. त्यांच्या घरातून सुमारे साडेचार तोळे वजनाचे दोन लाख 47 हजार रुपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.
चोरीची दुसरी घटना विशाल नगरात 24 सप्टेंबर रोजीच घडली होती. पूनम सतीश वांगी (वय-43, रा. ब्लॉक नं. 154, विशाल नगर, मेहता स्कूल जवळ ) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 22 हजार रुपये रोख रक्कम व 06 ग्रॅम वजनाच्या सोन्याची दोन मंगळसूत्रे व चांदीचे आरतीचे साहित्य असे सुमारे एक लाख 17 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.
दोन्ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद माने व सपोनि शैलेश खेडकर यांनी यांनी घटनेचा तपास केला. तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, तात्या पाटील, बापू साठे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबरचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड आदींनी कामगिरी केली. गुन्हे शाखेने अत्यंत कमी वेळेत सीसीटीव्हीची मदत घेऊन आरोपींना अटक केली.