

करमाळा : करमाळा तालुक्यातील वीट येथील भुजबळ वस्तीजवळ इनोव्हा कार व मोटारसायकलच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. अन्य आठ जण जखमी झाले. हा अपघात करमाळा वीट रस्त्यावर भुजबळ वस्तीजवळ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला.
अपघातात मोटारसायकलवरील हनुमंत केरू फलफले (वय 35), कांचन हनुमंत फलफले (31, दोघे रा. अंजनडोह, ता. करमाळा) व स्वाती शरद काशीद (25, ता. सराफवाडी, ता. इंदापूर जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. तर राजू विनोद धोत्रे (19), जयश्री विनोद धोत्रे (45),भारत पंजाबी (65),
राहुल विनोद धोत्रे (23) , विनोद धोत्रे (50), ईशान सोनी (19, सर्व रा. गोखलेनगर, पुणे) व अपर्णा दत्तात्रय होले (25), कार्तिक दत्तात्रयय होले (तीन, दोघेही रा. होलेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) अशी जखमींच नावे आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अपघात इतका भीषण होता की इनोव्हा कार (एमएच 04 ई/1001) मोटारसायकलला (क्रमांक 45 यु/3805) धडकल्यानंतर तीन चार ठिकाणी पलटी मारून रस्त्याखाली कोसळली. यावेळी मोटरसायकलवरील तिघेही चेंडूप्रमाणे उडून आपटून जागीच ठार झाले. कारमधील आठ जण जखमी झाले. या जखमींना उपजिल्हा रुग्णालय करमाळा व लहान बाळावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
बहिणीसह भाऊ-भावजयीचा मृत्यू
इनोव्हा कार ही पुण्यातून करमाळा तालुक्यातील भालेवाडी येथे निघाली होती. अंजनडोह येथील दसर्याच्या यात्रेस आलेल्या बहिणीला युवराज फलफले याने कपडे खरेदी करून ते अंजनडोहकडे निघाले असताना हा अपघात घडला. यामध्ये लाडक्या बहिणीसह तिचा भाऊ युवराज व पत्नी कांचन याचा करुण अंत झाला आहे.