

वैराग: बार्शी तालुक्यातील धामणगाव येथे रविवारी (दि.५) दुपारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. आपल्या ६ वर्षांच्या निष्पाप मुलाला वाचवण्यासाठी एका पित्याने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. यामध्ये पित्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
अरुण उर्फ डेव्हिड बनसोडे (वय ४५), मूळचे सोलापूरचे, पण सासरवाडी असल्याने काही दिवसांपासून धामणगाव दु. येथे वास्तव्यास होते. नियतीने क्रूर डाव खेळावा...रविवारी दुपारी ते आपल्या अनुग्रह आणि आशिष या दोन मुलांसोबत धामणगाव वैराग रस्त्यावरील नागझर नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी पाहण्यासाठी गेले.
जवळगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने नदी दुथडी भरून वाहत होती. पाण्याचा जोरदार प्रवाह होता. याच वेळी, ६ वर्षांचा अनुग्रह नदीचे पाणी पाहत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो क्षणात प्रवाहात पडला. मुलाला पाण्यात पडलेले पाहताच, वडिलांनी दुसरा कोणताही विचार केला नाही. क्षणभरही न थांबता, 'बापाचं काळीज' घेऊन अरुण उर्फ डेव्हिड यांनी आपल्या जीवाची परवा न करता थेट पाण्यात उडी घेतली. त्यांना पोहता येत नव्हते, याची कल्पना असूनही मुलासाठी त्यांनी मृत्यूला कवटाळण्याची तयारी दाखवली.
अखेरीस, त्या प्रेमाच्या झंझावातात त्यांनी गंभीर जखमी झालेल्या मुलाला पाण्याच्या प्रवाहातून वाचवण्यात यश मिळवले. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. पोहता येत नसल्यामुळे आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे अरुण उर्फ डेव्हिड यांना आपला स्वतःचा जीव गमवावा लागला. गंभीर जखमी झालेल्या मुलावर सध्या सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या मुलाला नवजीवन देणाऱ्या त्या पित्याच्या आठवणीने साऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. परिसरात दुःख आणि हळहळ व्यक्त होत आहे.