पोखरापूर : कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी महिला डॉक्टरला पती व सासऱ्याने वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ करून, शारीरिक व मानसिक छळ करून जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात पती व सासऱ्याच्या विरोधात बुधवारी (दि. ४) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरातील ३६ वर्षीय महिला डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार यांनी घरामध्ये छताचे पंख्याला साडीने गळफास घेऊन जीवन संपवल्यची घटना रविवार (दि. १) दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घडली होती.
डॉ. रश्मी बिराजदार यांचे मोहोळ येथील डॉ. आंबेडकर चौक येथे पहिल्या मजल्यावर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तेथेच दुसऱ्या मजल्यावर बिराजदार कुटुंबीय राहतात. डॉ. रश्मी यांनी जीवन संपवल्या प्रकरणी मल्लिकार्जुन भीमाप्पा गंडूर (रा. भैरीदेवरकप्पा ता. हुबळी जि. धारवाड, राज्य कर्नाटक ) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ४) फिर्याद दिली.
त्यानुसार डॉ. रश्मी यांचे पती संतोष शंकर बिराजदार याने दारूच्या आहारी जाऊन वेळोवेळी कर्ज करून ते कर्ज फेडण्यासाठी डॉ.रश्मी यांना माहेरहून पैसे आणण्यासाठी संतोष बिराजदार व सासरा शंकर बिराजदार यांनी वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ करून, तिचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती संतोष बिराजदार व सासरा शंकर बिराजदार (दोघे रा. मोहोळ) यांच्यावर जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.