

उत्तर सोलापूर : साथी पोर्टल बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील फर्टिलायझर, पेस्टिसाईडस् अँड सीडस् डीलर असोसिएशनच्या वतीने मंगळवारी खत व औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आली. या एका दिवसात सुमारे 40 कोटींची उलाढाल ठप्प झाली. सध्या सुरू असलेल्या ऑक्टोबर महिन्यात द्राक्षांची छाटणी केली जाते. त्यातच जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची अक्षरशः झोप उडाली आहे. अशाच स्थितीमध्ये जिल्ह्यातील खत औषध दुकानदारांनी एक दिवसाचा बंद ठेवला.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पंधराशे ते अठराशे दुकाने आजच्या दिवशी बंद ठेवली. तसेच राज्यभरातून जवळपास 70 ते 80 हजार दुकाने बंद ठेवली होती. हा बंद 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला. यामुळे राज्यभरातील सुमारे एक हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली.
राज्यातील खत व औषध दुकानदारांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. एकीकडे शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आहे. त्याला चांगल्या प्रतीचे बियाणे, खते, औषधे मिळाली पाहिजेत. ही भूमिका दुकानदारांची आहे. अशा परिस्थितीत कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर साथी पोर्टल लादले जात आहे, त्याविरोधात हा बंद होता.