

सोलापूर : सोलापुरात ऐतिहासिक निर्णय झाला असून तब्बल 289 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत सर्वच धर्मांच्या धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले. कोणताही कारवाई न होता सामंजस्याने हा प्रश्न मिटल्याने भोंगे हटविण्याचा ‘सोलापूर पॅटर्न’ राज्यात पथदर्शी ठरला आहे.
सोलापुरात सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्याबाबत पोलिस आयुक्त एम. राजकुमार आग्रही होते. त्यासाठी त्यांनी गेल्या महिनाभरापासून पोलिस ठाणे स्तरावर बैठका, सर्व धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींची बैठक घेतली. त्यानंतर सोमवारी (दि. 6) शहर पोलिस आयुक्तालयात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्मगुरूंच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती. भोंगे हटविण्यासाठी ही बैठक होती, मात्र बैठकीला येण्यापूर्वी सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे संबंधित धर्मगुरूंनी स्वतःहून उतरवून ते बैठकीला उपस्थित राहिले. यामुळे या बैठकीचा नूरच पालटला. भोंगे हटविण्यासाठी पोलिस आयुक्त आवाहन करणार होते मात्र ते करण्यापूर्वी सर्वच धर्मगुरूंनी भोंगे हटल्याचे सांगितल्याने पोलिस आयुक्तांना अभिनंदनाची बैठक घ्यावी लागली.
या बैठकीस पोलिस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. आश्विनी पाटील, गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजन माने, प्रताप पोमण, सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्यासह सर्वच पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, धार्मिक स्थळांचे ट्रस्टी, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
मशिदींवरील 192 भोंगे उतरवले
शहरातील 192 मशिदी, मदरसा, दर्गे, 79 मंदिरे, 10 चर्च आणि आठ बौद्ध विहार असे एकूण 289 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले आहेत. आणखीही काही धार्मिक स्थळांवर भोंगे असल्यास ते हटविणार असल्याची ग्वाही पोलिस आयुक्तांनी दिली.