

सांगोला : युवा महोत्सव ‘उन्मेष सृजनरंग’ स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी, उपविजेतेपद संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, तर तृतीय क्रमांक कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांनी पटकाविला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 21 व्या ‘उन्मेष सृजनरंग’ युवा महोत्सवाचा सांगता समारंभ सांगोला महाविद्यालयात दिमाखदार व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात सोलापूर जिल्ह्यातील 53 महाविद्यालयांनी सहभाग घेत, नृत्य, नाट्य, संगीत, ललित वाङ्मय, ललितकला अशा 39 कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले सृजनशीलतेचे कौशल्य सादर केले.
युवा महोत्सव दरम्यान सांगोला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पूरग्रस्तासाठी मदत निधी संकलन केंद्राकडून संकलीत झालेली मदतपेटी कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांच्याकडे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आली.
प्रा. डॉ. केदारनाथ काळवणे, संस्थाध्यक्ष बाबुराव गायकवाड, माधुरी पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपल्या खास शैलीत उपस्थित विद्यार्थ्यांना अनेक जीवनमूल्यांची शिकवण दिली.
‘ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचे अभिनंदन, पण ज्यांना मिळाले नाही त्यांचे विशेष अभिनंदन, कारण पराभवातूनच माणूस शिकतो,’ असे सांगत त्यांनी सातत्य, शिस्त, व्यसनमुक्त जीवनशैली, हुंडा प्रथेविरोधातील ठाम भूमिका, पर्यावरण संरक्षण, आणि स्वतःचा परीक्षक बनून सतत सुधारणा करत राहण्याचा व आपल्या भाषेचा, आपल्या माणसांचा अभिमान बाळगायला शिका, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, माणदेशातील संघर्षातून घडलेले विद्यार्थीच यशाचे शिखर गाठताते. सातत्य, मेहनत व संस्कृती जपणे हे जीवनाचे खरे मूल्य आहे.
सांगोला महाविद्यालयाने केलेल्या अचूक आयोजनामुळे हा महोत्सव मुल्याधारित आणि प्रेरणादायी ठरला. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, नदी स्वच्छता, तसेच पालकांचा सन्मान व समाजसेवेची भावना बाळगण्याचे आवाहन केले.
युवा महोत्सव पारितोषिक वितरण व समारोप समारंभाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर व कॅप्टन प्रा.संतोष कांबळे यांनी केले.