

सोलापूर : सोलापूरसह राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत ही आज सोमवारी (दि. 6 ऑक्टोबर) मुंबईत निघणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 12 नगरपालिका व नगरपंचायतींच्या इच्छुकांना हुरहुर लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय राजवटीमुळे विकासकामे रखडली आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतरही कामे होत नाहीत. त्यामुळे निवडणुका कधी होतील याकडे इच्छुकांचे लक्ष लागून होते.
आता आरक्षण प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. नगराध्यक्षपदासाठी दि. 6 ऑक्टोबर तर नगरसेवक पदासांठीचे आरक्षण सोडत ही बुधवार दि. 8 ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना काढले आहेत.नगरसेवकांच्या आरक्षण सोडत प्रक्रियेत नागरिकांचा मागास, अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील महिला आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
प्रारूप आरक्षणावर 9 ते 14 ऑक्टोबर दरम्यान हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी 17 ऑक्टोंबरपर्यंत विभागीय आयुक्तांना सादर करणार आहेत. प्रारूप आरक्षणावरील हरकती व सूचनांचा विचार करून विभागीय आयुक्त 24 ऑक्टोबरपर्यंत नगरसेवकांचे आरक्षण अंतिम करणार आहेत. त्यानंतर संबंधित नगरपालिकांचे मुख्याधिकारी 28 ऑक्टोबरपर्यंत अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करणार आहेत.
या आहेत नगरपालिका व नगरपंचायती
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, बार्शी, पंढरपूर, अकलूज, करमाळा, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा, कुर्डुवाडी नगरपरिषद आणि अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.