

पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी रविवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून योग्य नियोजन करावे. तसेच सर्व कामे 27 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज, महाविद्यालय येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना ज्याप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या. त्याप्रमाणेच कार्तिकी यात्रा कालावधीतही सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नगरपालिकेने शहरातील खड्डे तत्काळ बुजवावेत, सीसीटीव्ही यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. मुबलक स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा करावा, चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत. आवश्यक ठिकाणी बॅरेकेडींग करावे, अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तसेच प्रसादालयांच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी जादा पथकाची नेमणूक करावी.
शेगांव दुमाला ते जुना दगडीपूल येथे कोणत्याही स्टॉलला परवानगी देवू नये. जुना दगडी पुलाला बॅरेकेडींग करावे. बोटीत भाविकांसाठी लाईफ जॅकेटची व्यवस्था करावी. कार्तिकी यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने संबंधित यंत्रणेने आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच बाहेरील राज्यातून येणाऱ्या जनावरांची चेक पोस्टवरच आरोग्य तपासणी करावी.
यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना जलद व सुखकर दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीकडून योग्य नियोजन करण्यात आले असून, पत्राशेड, दर्शन रांगेतील भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले. तर त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाकडून भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छता याबाबतची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.