पंढरपूर : उजनी व वीर धरणे भरल्यानंतर धरणातून सोडण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामूळे भीमा नदीला पूर आला आहे. पंढरपूर येथे या पुराचे पाणी १ लाख ४० हजार क्युसेकने वाहत आहे. भीमा (चंद्रभागा ) ही धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे नदीपात्रातील ६ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे व ६ पूल बुडाले आहेत. त्यामुळे यावरुन होणारी वाहतूक दोन दिवसापासून बंद करण्यात आली आहे. तर पंढरपूर येथील व्यासनारायण झोपडपट्टीत पूराचे पाणी शिरले आहे. यामुळे येथील ३५ झोपडपट्टी धारकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाणी पातळी आणखी वाढत असल्याने नागरिक व प्रशासन सतर्क झाले आहे.
भीमा (चंद्रभागा) नदीला उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर आला आहे. भीमा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. यामुळे पूराचे पाणी नदीकाठच्या शेतातील पिकांमध्ये शिरले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केल जात आहे. तर मुंडेवाडी, करोळे, पटवर्धन कुरोली, आवे, कौठाळी, गोपाळपूर विष्णुपद हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर दगडी पूल, गोपाळपूर येथील जुना पूल, होळे -कौठाळी पूल, पुळूज शंकरगाव पूल, नेवरे -नांदोरे, पंढरपूर जुना अकलूज रोड पूल हे सहा पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
भीमा नदीची पंढरपूर येथील पाणी पातळी 445 मीटर आहे. ही पाणी पातळी धोक्याची आहे. यामुळे जुना दगडी पूल पाण्याखाली तर गेला आहेत. मात्र, पंढरपूर मंगळवेढा रोडवरील गोपाळपूर येथील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढ्याची वाहतूक नवीन पुलावरुन वळवण्यात आली आहे. तर पंढरपूर ते जुना अकलूज रोडवरील शिरढोण येथे रस्त्यावर दहा फुट इतके पाणी आले आहे. त्यामुळे येथून होणारी वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे.
दरम्यान, पंढरपूर येथील नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील 35 कुटुंबांना नोटीसा देवून स्थलांतर करण्यात आले आहे. तर या स्थलांतरीत कुटुंबाचे उपजिल्हा रुग्णालयाशेजारील रायगड समाज दिंडी मठ व जुन्या न्यायालयासमोरील लोकमान्य विद्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे नगरपालिका उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांनी सांगीतले. तर या स्थलांतरीतांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून 500 स्थलंतरीत लोकांना सकाळी, दुपारी व संध्याकाळी असे तीन वेळा फुड पॅकेट वाटप करण्यात येत आहेत.
दरम्यान, दर वेळेस पूर येतो. दरवेळेस आमचे स्थलांतर होते. हे व्हायला नको म्हणून प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात. व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील स्थलांतरीतांनी आमचे स्थलांतर न करता कायमस्वरुपी घर बांधून देण्याची मागणी केली आहे. आहे त्या ठिकाणी खाली पार्किंग व वरती घरे बांधून देण्याची मागणी केली आहे.
मुंडेवाडी, करोळे, पटवर्धन कुरोली, आवे, कौठाळी, गोपाळपूर विष्णुपद हे 6 बंधारे तर पंढरपूर येथील दगडी पूल, गोपाळपूर येथील जुना पूल, होळे -कौठाळी पूल, पुळूज शंकरगाव पूल, नेवरे -नांदोरे, पंढरपूर जुना अकलूज रोड पूल हे सहा पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या बंधारे, पूलावरील वाहतूक बंद केली आहे.
गेल्या बारा दिवसापासून वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे भीमा नदीला पूर आला आहे. यातच उजनीतून एक लाखाहून अधिकचा विसर्ग करण्यात येत असल्याने महापूर आला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांची चिंता वाढली आहे. असे असतानाच वीर धरण परिसरात पाऊस थांबला असल्याने मंगळवारी दुपारी विसर्ग पुर्णत: बंद केला आहे. यामुळे पूरस्थिती कमी होण्यास मदत होणार असल्याने काहीअंशी दिला मिळाला आहे.