पंढरपूर : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे आणि याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पंढरपूर येथे 11 व्या दिवशी देखील आमरण उपोषण सुरू आहे. सरकार दखल घेत नसल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी व अंतिम निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि. 20) राज्यभरातील धनगर समाजातील नेतेमंडळींची राज्यव्यापी बैठक आंदोलनस्थळी दुपारी चार वाजता होणार आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे आंदोलकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाज आंदोलनस्थळी परिस्थिती चिघळत चालली आहे. गुरुवारी (दि. 19) उपोषणकर्ते गणेश केसकर यांची तब्येत ढासळल्याने त्यांना खासगी दवाखान्यात उपचाराकरीता दाखल केले. सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना उपोषणकर्ते व धनगर समाजामध्ये निर्माण झाली आहे.
या आंदोलनाची धार तीव्र होत असून राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. गुरुवारी अनिरुद्ध खताळ यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील धनगर समाज बांधव मोटारसायकल रॅली घेऊन पंढरपूर येथे आले. सरकार वेळकाढूपणा करत असल्यामुळे याचा निषेध म्हणून त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी केली.