अकलुज : सराटी-अकलुज येथे निरा नदीत तिघे मित्र पोहायला गेले होते. यादरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले. यातील एका तरूणाचा मृत्यू झाला असून एकाचा शोध सुरू आहे. ही घटना मंगळवारी (दि.१) दुपारी तीनच्या पुणे-सोलापूर जिल्हा सरहद्दीत घडली. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता तरूणाचा शोध सुरू होता.
याबाबत अधिक माहिती अशी, पुणे-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील निरा नदीपात्रात मरिबा औदुंबर काळे (वय २१), अनिकेत उर्फ निखिल कुंडलिक जाधव ( वय २०) व प्रकाश चंद्रकांत वाडेकर हे तिघे मित्र दुचाकीवरून पोहायला गेले होते. यादरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने प्रकाश वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी अनिकेत गेला असता दोघेही खोल पाण्यात बुडाले. आपल्या मित्रांना बुडताना पाहून मरीबा काळे नदीकाठी बेशुद्ध पडला. त्यावेळी नदीवर दस-याचे धुणे धुण्यासाठी आलेल्या नागरिकांनी त्याला उपचारासाठी अकलुज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला असता निखील उर्फ अनिकेत जाधव याचा मृतदेह सापडला तर प्रकाश वाडेकर यांचा शोध घेतला पण तो मिळून आला नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी देवीदास पवार यांनी दिली. दरम्यान अकलुज पोलिसांना माहिती मिळताच पो.नि.भानुदास निंभोरे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जनरेटर च्या उजेडात रात्री उशिरापर्यंत बेपत्ता तरूणाचा नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही.