

भोसे : नंदेश्वर ते रेवेवाडी रस्त्याचे चालू काम रखडल्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर काम चालू करण्यात यावे, अशी मागणी या भागातील प्रवाशांमधून होत आहे. सध्या सूर्यफूल व मक्याचे सीजन चालू आहे. भोसे येथे मका व सूर्यफूल मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. गुंजेगाव लक्ष्मी दहिवडीपासूनचा शेतीमाल विक्रीसाठी आणला जातो. सध्या रस्त्यावरती खडीकरणाचे दोन थर झाले आहेत. परंतु काम थांबल्यामुळे ती खडी पूर्णतः रस्त्यावरून उखडली गेली आहे. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचे टायर फुटणे, पम्चर होणे, तसेच लहान गाड्यांनादेखील खालून दगड उडाल्यामुळे नुकसान होत आहे.
एसटी किंवा मोठे वाहन गेल्यास पाठीमागून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना धुळीमुळे समोरील काही दिसत नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कालच काकडे वस्ती स्टॉप शेजारील रस्त्याकडेला असलेल्या जाधव वस्तीवरील एका महिलेला रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाखालून दगड उडून लागल्यामुळे ती महिला बेशुद्ध होऊन पडली. आतापर्यंत बऱ्याच वाहनांचे नुकसान झाले आहे. याचा परिणाम भोसे बाजारपेठेवर होत आहे. तरी लवकरात लवकर काम चालू करावे नाहीतर तात्पुरते पाण्याचा टँकर सोडून पाठीमागून रोलिंग तरी करून घ्यावे, अशी मागणी या भागातील प्रवासी व वाहनधारकांमधून होत आहे.