

माळशिरस : माळशिरस पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गाचे निघाले आहे. त्यामुळे आता पंचायत समिती निवडणुकीमध्ये चुरस जाणवणार आहे. सर्वच पक्षांमध्ये अनेक जण इच्छुक असणार आहेत. त्याबरोबर पुरुषांबरोबर महिलाही इच्छुक असणार असून, आता निवडणुकीनंतर ज्या पक्षाची पंचायत समितीवर सत्ता येईल. त्या पक्षांमध्ये सुद्धा सभापती पदासाठी रस्सीखेच लागणार आहे.
माळशिरस पंचायत समितीमध्ये पंचायत समितीचे 9 गण आहेत. त्यामधून 18 पंचायत समितीचे सदस्य निवडले जाणार आहेत. गत पंचायत समितीमध्ये 11 गणातून 22 सदस्य निवडून आले होते. परंतु, अकलूज नगर परिषद व माळशिरस नातेपुते व महाळुंग या नगरपंचायती झाल्याने पंचायत समितीचे चार सदस्य कमी झाले आहेत. तसेच नव्याने अनेक पंचायत समिती गण तयार झाले आहेत. त्या पंचायत समिती गणात इच्छुकांनी मोर्चे बांधणी चालू केली आहे. परंतु, आता पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण निघाल्याने आता प्रत्येक गणात सर्व पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या जादा असणार आहे.
माळशिरस पंचायत समितीवर आजपर्यंत काही अपवाद वगळता विजय सिंह मोहिते-पाटील गटाची सत्ता अबाधित राहिली आहे. मोहिते- पाटील गटाकडून अनेकांना याआधी सभापती पदाची संधी मिळाली आहे. याआधी मोहिते - पाटील गटा विरुद्ध भाजप अशी लढत होत होती. यावेळी सुद्धा भाजपाने माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
तर मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक आमदार उत्तमराव जानकर हे आता मोहिते - पाटील गटाबरोबर असल्याने मोहिते - पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांच्या गटाविरोधात भाजप मोठ्या ताकतीने या निवडणुकीसाठी उतरण्याचे संकेत मिळत आहेत.
पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून या निवडणुकीवर लक्ष राहणार आहे. त्यादृष्टीने माजी आमदार राम सातपुते तालुक्यात संपर्क ठेवत आहेत. तर खासदार धैर्यशील मोहिते - पाटील, आमदार उत्तमराव जानकर व माजी सभापती अर्जुन सिंह मोहिते -पाटील यांनीही पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी दौरे वाढवले आहेत. त्यांनीही पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी चालू केली आहे.
सभापती पदाचे आरक्षण निघाल्याने लवकरच पंचायत समिती गणाचे आरक्षण निघणार आहे. पंचायत समितीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष पंचायत समितीची सत्ता आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आता निवडणुकीनंतर पंचायत समितीवर कोणाची सत्ता येते व सभापती कोण होणार? याची उत्सुकता तालुक्यातील नागरिकांना लागली आहे.