वैराग : पुढारी वृत्तसेवा
गावातील रस्त्याच्या कडेला अज्ञातांनी फेकुन दिलेली विषारी औषधाची बाटली लहान चिमुकलीने खेळण्यासाठी घेतली. नंतर तिने खेळत-खेळत त्या बाटलीतील विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे मुंगशी येथील दुर्वा विनोद क्षीरसागर (वय 3 वर्षे) या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाला.
लहान चिमुकलीची गेली महिनाभर सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर शेवटची ठरली. ही घटना बार्शी तालुक्यातील मुंगशी ( वा ) येथे घडली आहे. तिने औषध प्राशन केल्याची घटना तिच्या सोबत खेळणाऱ्या चिमुकल्या संवगडींमुळे उघडकीस आली. त्यानंतर तात्काळ उलटीचा त्रास सुरू झाल्याने तिच्यावर वैराग येथे खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून तिला बार्शी येथील खासगी दवाखान्यात दाखल केले, परंतू तिचे शरीर साथ देत नसल्याने तीला सोलापूर येथे हलवण्यात आले. परंतू तिच्या संपूर्ण शरीरात विष भीनल्याने प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यानंतर काल तिची प्राणज्योत मालवली.
या घटनेनं मात्र मुंगशी गावात हळहळ व्यक्त होत आहे. अशा घटना समाजात घडत असताना पालकांनी देखील आपल्या लहान मुलांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तसेच विषारी औषधे वापरणाऱ्या व्यक्तींनी देखील ते औषध वापरल्यानंतर बाटली किंवा पॅकेटची काळजीपुर्वक विल्हेवाट लावली पाहिजे तरच अशा दुर्घटना टळतील.