बार्शी : माढा तालुक्यातील सुरली येथील मोबाईलच्या वादातून झालेल्या खूनाबाबत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कृष्णा दादासाहेब कांबळे (रा. देवदैठण ता. जामखेड) असे आरोपीचे नाव आहे.
माढा तालुक्यातील सुरली येथील फिर्यादी मुकुंद चव्हाण यांच्या शेतालगतच असणारे समाधान सरडे यांच्या शेतात आरोपी कृष्णा दादासाहेब कांबळे हा शेतमजूर म्हणून कामास होता. २१ जून २०१८ ला दुपारी ४ वाजताच्या सुमारास फिर्यादीची आई द्वारकाबाई चव्हाण ही शेतात विहिरीवरील मोटर चालू करण्यास गेली. त्यादरम्यान तिने ठेवलेल्या ठिकाणी मोबाईल मिळून आला नाही. म्हणून बाजूच्या शेतात काम करणाऱ्या आरोपी कृष्णा यास मोबाईल बाबत विचारले असता त्या दोघांमध्ये भांडण झाले. तेव्हा तिचा पुतण्या योगेश चव्हाण यांनी भांडण सोडवले. त्यानंतर द्वारकाबाई कृष्णाने केलेल्या भांडणाबाबत त्याला घेऊन त्याच्या मालकाकडे जात असताना आरोपीने आपली बदनामी होईल, या कारणाने रागाच्याभरात लोखंडी खोऱ्याचा तुंबा तिच्या डोक्यात मारून तिचा खून केला होता.
सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी आरोपी कृष्णा दादासाहेब कांबळे (रा. देवदैठण ता. जामखेड) याच्याविरुद्ध टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून बार्शी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्ह्यासाठी १२ साक्षीदार तपासण्यात आले. यातील साक्षीदार व डॉक्टर यांची साक्ष तसेच तपासी अंमलदार यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे हे सरकारी वकिल राजश्री कदम यांनी न्यायालयासमोर मांडले. सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता जिल्हा न्यायाधीशांनी आरोपी कृष्णा दादासाहेब कांबळे यास खून प्रकरणी दोषी ठरवून जन्मठेप व १५००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
सरकार पक्षा तर्फे राजश्री कदम यांनी कायदेशीर बाबीवर जोरदार युक्तिवाद केला व काम पाहीले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी वेळोवेळी साक्षीदार, पुरावे हजर ठेवण्याचे काम पाहिले. यामध्ये करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.