

सोलापूर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून दोघांनी कुर्हाडीने घाव घालून 36 वर्षीय इसमाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना विजापूर रोडवरील गरिबी हटाव झोपडपट्टी येथे घडली. यतिराज दयानंद शंके (वय 36, रा. गरिबी हटाव झोपटपट्टी, विजापूर रोड, सोलापूर) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी दोघांवर विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास शंके याच्या घरासमोर भांडणाचा आवाज सुरू होता. यावेळी शंके यांची पत्नी प्रतिभा यतिराज शंके यांनी बाहेर येऊन पाहिले असता आकाश तुळजाराम बलरामवाले आणि नवल खरे (दोघे रा. गरिबी हटाव झोपडपट्टी, विजापूर रोड, सोलापूर) हे यतिराज याच्याकडे दारू पिण्यास पैशाची मागणी करीत होते. यतिराज याने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यास शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. यतीराजला मारहाण होत असताना पत्नी प्रतिभा हिने सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु तिला देखील मारहाण करण्यात आली. आकाशने जवळच असलेल्या त्याच्या घरातून कुर्हाड आणली. यतीराज याच्या डोक्याच्या मागील बाजूस कुर्हाडीने वार केला. यामुळे त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. यानंतर तत्ळा: यतीराज याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना यतीराज याचा मृत्यू झाला. याबाबत प्रतिभा हिने दिलेल्या फिर्यादीवरुन आकाश बलरामवाले आणि नवल खरे यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर दोन्ही आरोपी पळून गेले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वराळे करीत आहेत.
यातील मृत यतीराज शंके याचे पान दुकान आहे तर आरोपी आकाश बलरामवाले आणि नवल खरे हे मजुरीचे काम करतात. तिघांची घरे जवळच आहेत. दररोजचा संबंध आहे. केवळ दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात दोघांनी यतीराज याच्यावर कुर्हाडीने वार केले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गरीबी हटाव झोपडपट्टी येथे हातावरचे पोट असणारी अनेक कुटुंबे राहतात. त्यात यतीराज हा सर्वांशी परिचत असा होता. प्रत्येकाशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. परंतु नियतीने त्याच्यावर असा प्रसंग ओढावला आणि त्याला जीव गमावावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.