

पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील कोळेगाव हद्दीतील विशाल निर्मिती लि. कंपनीत काम करणाऱ्या झारखंड येथील कामगाराचा मागील भांडणाचा राग मनात धरून इतर तीन कामगारांनी पोटात चाकू खूपसुन खून केल्याची घटना दि. 21 ऑक्टोबर रोजी घडली.
पुतकर लोहार असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी झारखंड येथील मनिया अंगरिया, रेनसो लागुरी, गुरा गुया अशा तिघांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला. सदर कंपनीत रेल्वे रुळासाठी लागणारे मोनोबॉल्क कॉक्रेट स्लीपर तयार होतात. त्या कंपनीत परराज्यातील कामगार काम करतात. त्यांच्या राहण्याची सोय कंपनीच्या समोर असलेल्या वसाहतीत आहे. हेड सुपरवाईझर रामा प्रधान हे या कामगारावर देखरेख करीत असतात.
काही महिनेपूर्वी झारखंड येथील पुतकर लोहार, मनिया अगरिया, रेनसो लागुरी, गुरा गुया असे कामगार कंपनीत कामांस आले. 21 ऑक्टोबर रोजी त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. सर्वजण मिळून काम संपल्यानंतर बाहेर पडले. मात्र 21 ऑक्टोबर रात्री साडेनऊच्या सुमारास मनिया अंगरिया व रेनसो लागुरी असे दोघेच परत आले होते. इतर दोघांबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्हास माहीत नाही, त्यांचे फोन लागत नाही असे सांगितले.
22 ऑक्टोबर रोजी पुन्हा सकाळी पुतकर लोहार व गुरा गुया यांची शोधाशोध, विचारपूस सुरू झाली. तेव्हा मनिया अंगरिया व रेनसों लागुरी यांनी सांगितले की, काल रात्री आम्ही बाजारात गेलो असता मागील भांडणाच्या कारणावरून आमचे व पुतकर लोहार याचे पुन्हा भांडण झाले. आम्ही त्यांचे पोटात चाकू खुपसून जीवे ठार मारले. त्याचे प्रेत वडवळ ब्रीज खालील रेल्वे पटरीच्याकडेला झुडपात फेकुन दिले आहे. यावरून कंपनीचे सुपरवायझर प्रकाश पाटील यांनी वरील तिघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.