

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे काही दिवसापूर्वी पाटील यांच्या घराच्या पाया खोदताना सापडलेला शिलालेख यादवांचा राजा सिंहदेव यांचा आहे. शिलालेखाच्या वाचनानंतर हे सिद्ध झाले.यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज व सातारा जिल्ह्यातील राजाचे कुर्ले येथे यादवाचा राजा सिंहदेव यांचे शिलालेख सापडले आहेत.
यादवांचा राजा सिंहदेव याचा शिलालेख वडाळा येथे सापडल्यामुळे वडाळा गावाच्या इतिहासात नवीन भर पडली आहे. वडाळा गावात मध्यवर्ती ठिकाणी राहणाऱ्या बाळाजी लिंबाजी पाटील यांच्या घराचा पाया खोदत असताना हा शिलालेख आढळून आला होता. इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन शिलालेखाचे ठसे घेऊन अनिल दुधाने यांच्याकडे पाठविले. बऱ्याच कालावधीनंतर शिलालेखावरील मजकूर वाचण्यात दुधाने यांना यश मिळाले. शिलालेखावर देवनागरी लिपीतील सहा ओळी आहेत. मन्मथ संवत्सरात राजा सिंहदेव याने राइ (राम) सेठी यास भाताचे शेत दान दिले. या दानाच्या कार्य प्रसंगी साक्षीदार म्हणून संकुम नायक व मइ नायक हे दोघे हजर होते. असा महत्वपूर्ण उल्लेख शिलालेखावर आढळून आला आहे.
सिंहदेव राजाचा दान शिलालेख
वडाळा येथे सापडलेला शिलालेख राजा सिंहदेव याचा दान शिलालेख असून या परिसरातील भाताची शेत राम शेठी यांना दान दिले त्यावेळी दोन साक्षीदार उपस्थित होते त्यांची देखील शिलालेखावर नावे कोरलेली आहेत.यावरून त्याकाळात या परिसरात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. असे मत इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्यावर सिंहदेवाची सत्ता
बाराव्या शतकात यादव वंशातील सिंहदेव हा दक्षिण महाराष्ट्रावर राज्य करणारा एक स्थानिक शासक होता.त्याचे राज्य सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या भूभागावर होते.असे मत वडाळा येथील शिलालेखाचे वाचना केल्यानंतर अथर्व पिंगळे व अनिल दुधाणे यांनी व्यक्त केले.