

सोलापूर : शहरातील न्यू बुधवार पेठ परिसरात मंगळवारी (दि 14) सकाळी खळबळजनक घटना समोर आली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा चाकूने वार करीत खून केला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित पतीला अटक करण्यात आली.
याबाबत हकिकत अशी की, न्यू बुधवार पेठेतील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या यशोदा सुहास सिद्धगणेश (वय 35) यांच्या घरातून मंगळवारी सकाळी ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. फिर्यादी अन्नपूर्णा नीलकंठ बाळशंकर (वय 50, रा. रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ, सोलापूर) या तेथे गेल्या, त्यावेळी आरोपी सुहास तुकाराम सिध्दगणेश (वय 43) हा हातात चाकू घेऊन यशोदी हिच्या गळ्यावर व पोटात वार करीत होता. त्याला सोडविण्यासाठी गेल्या असता आमच्या दोघात कोण आलं तर त्याला पण खल्लास करेन अशी धमकी त्याने दिली. यशोदा हिच्यावर वार केल्यानंतर तो पळून गेला. आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले. त्यानंतर यशोदा हिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वी ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच जोडभावी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. सुहास हा चारित्र्याच्या संशयावरून यशोदा हिला मारहाण करीत होता. त्यातून त्याने हा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. फिर्यादी यांनीही एफआयआर मध्ये चारित्र्याच्या संंशयावरून सुहास याने यशोदाचा खून केल्याचे म्हंटले आहे. यशोदा आणि सुहास यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. आरोपी सुहास यास पोलिसांनी हत्यारासह अटक केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.