

माढा : पूरग्रस्तांचे संसार उभे केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. निकषाच्या पुढे जाऊन सरकारने मदत जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या पंचनाम्याची मदत दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. ते माढा तालुक्यात पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी वाकाव, उदंरगाव व केवड येेथे आले असताना बोलत होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले, पूरग्रस्त बाधित कुटुंबांना शक्य ती मदत करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी घेतला. ते सर्व साहित्य असलेले सोळा प्रकारच्या वस्तूंचे कीट पूरग्रस्तांना वाटप करत आहोत. पूरस्थितीचा धैर्याने सामना केल्याबद्दल जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
यावेळी आ. अभिजित पाटील, प्रा शिवाजीराव सावंत, रणजित शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले, गटविकास अधिकारी महेश सुळे, दादासाहेब साठे, मीनल साठे, पृथ्वीराज सावंत, तालुका अध्यक्ष योगेश पाटील, राजाभाऊ चवरे, मुन्ना साठे, शहाजी साठे, नंदकुमार मोरे, दत्ता जाधव उपस्थित होते.