मोहोळ : पुढारी वृत्तसेवा
पुढील पाच वर्षे शेतीला मोफत वीज देण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत वीज बिल माफीचा आदेश काढण्यात येणार आहे. साडेनऊ हजार मेगावॅट विजेची निर्मिती सौर ऊर्जेवर केली जाणार आहे. सिना-भोगावती जोडकालव्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आ. यशवंत माने हेच येत्या विधानसभेचे उमेदवार असतील, असे त्यांनी जाहीर केले.
मोहोळ येथील बाजार समितीच्या मैदानावर रविवारी ‘जनसंवाद यात्रा व लाडक्या बहिणींशी संवाद’ हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानावरून उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी आमदार राजन पाटील, लोकनेतेचे अध्यक्ष विक्रांत पाटील, कल्याणराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले की, मोहोळकरांना निधीची कमतरता भासू देणार नाही. मोहोळ आणि बारामती फार लांब नाही. आम्ही जरी महायुती बरोबर असलो तरी आम्ही सेक्युलर विचारधारा सोडलेली नाही. राणे यांचे नाव न घेता महाराष्ट्रात काही लोक जातीवादी वक्तव्य करीत आहेत. त्याचं समर्थन राष्ट्रवादी कधीच करीत नाही. माझ्याबद्दल अपप्रचार करण्यात येतो मात्र आम्ही वडीलधार्यांचा आदरच करतो, असे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले की, राजन पाटलांना न्याय देण्यात आम्ही कमी पडलो आहोत मात्र विक्रांत पाटील यांच्या कार्याची आणि कर्तृत्त्वाची सर्वांना कल्पना आहे ते आणि अजिंक्यराणा पाटील सातत्याने मतदार संघातील विकासाबाबत आणि प्रश्न सोडविण्या बाबत सक्रीय असतात. माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांनी मोहोळ मतदार संघातील पावणेतीन ते चार हजार कोटी रुपयांतून करण्यात येणार्या विकासकामांचा आढावा सादर केला. यावेळी आमदार यशवंत माने यांनीही उमेश पाटील यांच्यावर निशाणा साधत त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष तटकरे व अजित दादांकडे केली. तालुका उपाध्यक्ष हेमंत गरड यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला किसन जाधव, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपाध्यक्ष हेमंत गरड, वैभव गुंड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे, कार्याध्यक्षा ज्योत्स्ना पाटील, प्रमोद डोके, रामदास चवरे,राजाभाऊ गुंड,सतिश भोसले,मदन पाटील,शरद पाटील, सचिन बाबर,मुजिब मुजावर,प्रशांत बचुटे,निरीक्षिका दिपाली पांढरे,माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई मार्तंडे,माजी सभापती सुरेखाताई पाटील,कार्याध्यक्षा उज्ज्वला पाटील, सोलापूर शहर अध्यक्षा संगीता जोगधनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम, समन्वयक शशिकला कसपटे, शिवाजी वाघमारे, मंगलाबाई सोनार, सुरेखा घाडगे, राणीताई डोंगरे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, लाडक्या बहिणी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
सध्या मोहोळ तालुक्यात गाजत असलेल्या अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार गटाचेच प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर टीका केली. त्यांचेे नाव न घेता पवार म्हणाले, माझा दौरा रद्द केल्याचे त्यांनी सांगितले होते; मात्र माझा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे. उमेश पाटील हे तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी करीत आहेत. यावरून या पक्षात दुफळी पडल्याचे दिसून आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आष्टी तलाव ते मोहोळ या 44 कोटी 65 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन तसेच मोहोळ शहरासाठी 138 कोटी रुपयांच्या भूमिगत गटाराच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.