

सोलापूर : शहरातील विजापूर रोडवरील जैन मंदिर आणि धानम्मा मंदिरातील चोरीस गेलेल्या मूर्ती सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 तासांत हस्तगत करीत तीन आरोपींना अटक केली. याबाबत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
4 ऑक्टोबर रोजी शहरातील विजापूर रोडवरील बाहुबली जैन मंदिर येथून पंचधातूच्या मूर्ती, रोख रक्कम असा एक लाख 73 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. त्याच दिवशी रेवणसिद्धेश्वर मंदिरा समोरील धानम्मा देवी मंदिर येथून मूर्ती आणि सहा हजार रुपये रोख चोरीस गेले होते.
याबाबत शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळी भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाला सूचना केल्या. त्यानुसार पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्री केली.
सदर गुन्हेगार मूर्ती विक्रीसाठी पाच ऑक्टोबर रोजी मोदी येथील रेल्वे पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सापळा रचून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेल्या देव-देवितांच्या मूर्ती आणि रोख दोन हजार रुपये हस्तगत केले. आकाश सुरेश पवार (वय 26, रा. नेहरू नगर, विजापूर रोड), अशपाक मौला शेख (वय 27, रा. थोरली इरण्णा वस्ती, विजापूर रोड) आणि करण ऊर्फ करण्या केंगार (रा. दमाणी नगर) अशी चोरट्यांची नावे आहेत. कमी वेळात कौशल्याने तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांचे कौतुक केले.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, शैलेश खेडकर, संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.
या अनमोल मूर्ती गेल्या होत्या चोरीला
पद्मावती देवीच्या पंचधातूच्या 02 मूर्ती, बाहुबली देवाची पंचधातूची 01 मूर्ती, आदिनाथ देवाची पंचधातूची 01 मूर्ती, जैन धर्मातील 24 तीर्थंकरांची 01 मूर्ती, पार्श्वनाथ देवाची 01 मूर्ती, अनंतनाथ देवाची 01 मूर्ती व शांतिनाथ देवाची 01 मूर्ती अशा आठ मूर्ती चोरीस गेल्या होत्या. त्या सर्व मूर्ती पोलिसांनी हस्तगत केल्या.
आरोपी सराईत गुन्हेगार
या गुन्ह्यातील आरोपी आकाश पवार आणि अशपाक शेख हे सराईत गुन्हेगार आहेत. आकाश पवार याच्यावर दहा गुन्हे दाखल असून, त्याला तडीपार करण्यात आले होते. अशपाक शेख याच्या विरोधात 13 गुन्हे दाखल असून, त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.