

सोलापूर : तुमच्या बँक खात्यावर परदेशातून वीस कोटींची रक्कम जमा झाली आहे, त्यात वीस लाखांचे कमिशनही तुम्हाला मिळाले आहेत. याबाबत नवी दिल्लीत सीबीआयकडून गुन्हा दाखल झाला आहे. तुम्हाला डिजिटल अरेस्टही केल्याचे सांगून सोलापुरातील ज्येष्ठ दाम्पत्याची दोघा भामट्यांनी 41 लाखांची फसवणूक केली. याबाबतची तक्रार नारायणदास किसनदास भुतडा (वय 69, रा. जोडभावी पेठ) यांनी सायबर पोलिसांत दिली.
फसवणुकीची ही घटना 3 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 25 या कालावधीत घडली. राजेश शर्मा, संदीप राव आणि अन्य बँक खातेदारांसह त्यांना मदत करणारे साथीदार (सर्व रा. दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सीबीआय अधिकारी संदीप राव याने परदेशातून तुमच्या बँक खात्यामध्ये दोन कोटी रुपये जमा झाल्याचे मोबाईलवरून सांगितले आहे. सीबीआयमध्ये गुन्हा दाखल झाल्याचे खोटेच सांगत डिजीटल ॲरेस्ट केल्याचेही सांगितले. वेगवेगळ्या विभागाचे खोटे इंग्रजी भाषेतील बनावट कागदपत्रे व्हॉट्ॲपवर पाठविली. भीती दाखवित 41 लाखांना गंडा घातला, असे सायबर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.