

सोलापूर : भाजपने देशात आणि महाराष्ट्र राज्यात वोट चोरी करून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने वोट चोर गद्दी छोड स्वाक्षरी मोहीम सोमवारपासून सुरुवात केली आहे. यावेळी खा. प्रणिती शिंदे, पक्ष निरीक्षक मोहन जोशी, बी.एम. संदीप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत.
लोकशाहीवर हल्ला, मताधिकार चोरीविरोधात काँग्रेस पक्षाकडून राज्यभर स्वाक्षरी मोहीम घेऊन जनतेला जागरूक करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे.
लोकशाही, संविधानावर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात, जनतेच्या मताधिकाराच्या संरक्षणासाठी सोलापूर शहर काँग्रेसच्यावतीने वोट चोर गद्दी छोड असा नारा देत वोट चोरी विरोधातील स्वाक्षरी मोहीम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी बी. एम. संदीप, काँग्रेस निरीक्षक मोहन जोशी, खा. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या उपस्थितीत अभिवादन करुन सुरुवात करण्यात आली.
यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, अरिफ शेख, रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, मनोज यलगुलवार, हणमंतु सायबोळू, प्रमिला तुपलवंडे, जुबेर कुरेशी, देविदास गायकवाड, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, ॲड. मयूर खरात यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वोट चोरी करून भाजप सत्तेवर
लोकशाहीवर सुरू असलेल्या हल्ल्याच्या विरोधात नागरिकांचा संताप व्यक्त करण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहेत. काँग्रेस ज्याठिकाणी मजबूत आहे, त्याठिकाणी सुनियोजित पद्धतीने वोट चोरी करण्यात आल्याचा दावा अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी बी. एम. संदीप यांनी केला आहे.