

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुधवारी (दि. 15) सोलापुरात येत असून, त्यांच्या हस्ते मुंबई-सोलापूर विमानसेवेचा मुंबईत शुभारंभ होणार आहे. त्यानंतर ते त्याच विमानाने पहिले प्रवासी म्हणून सोलापुरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीतच होटगी रोडवरील विमानतळावर विमानसेवा शुभारंभ कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त कुटुंबांना त्यांच्या उपस्थितीत संसारोपयोगी किटचे वाटप करण्यात येणार आहे.
सप्टेंबर महिन्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे 12 हजार 300 कुटुंबे बाधित झाली आहेत. या बाधितांना शासनाच्या वतीने दिवाळी किट दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटी 49 लाख रुपये निधीतून किट तयार करण्यात आले आहेत. या किटचे वाटप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे.
त्यानंतर ते हेलिकॉप्टरने माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना या ठिकाणी दुपारी अडीच वाजता कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. मंगळवेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.