

पंढरपूर : वीकेंड आणि शासकीय सुट्टी असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये येत आहेत. पंढरीत आलेला भाविक प्रथमत: चंद्रभागा स्नानाला महत्त्व देतो. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून आलेले दोघे मित्र चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी उतरले. तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली आहे, तर एका तरुणास वाचविण्यात स्थानिक कोळीबांधव व भाविकांना यश आले आहे.
दर्शन नारायण कोलते (वय 18) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तो (रा. न्हावी, ता. यावल, जि. जळगाव) येथील रहिवासी आहे. दरम्यान, दर्शन कोलते व त्याचा एक मित्र पंढरपूरला विठ्ठल दर्शन घेण्यासाठी आले होते. पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर दर्शन आणि त्याचा मित्र सकाळी चंद्रभागा नदी पात्रात स्नानासाठी गेले होते. येथील भक्त पुंडलिक मंदिराजवळ ते स्नान करण्यासाठी नदीत उतरले होते.
दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने दर्शन व त्याचा मित्र दोघेही बुडाले. दोघेजण बुडत असल्याचे नदीत असलेल्या भाविकांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी लागलीच मदत करत एकाला बाहेर काढत वाचवले. मात्र, दर्शन कोलते हा तरूण पाण्यात बुडाला. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. त्यानंतर पोलीस प्रशासन व बचाव पथक येथे दाखल झाले. त्यांच्याकडून बुडलेल्या तरूणाचा शोध घेतला. तो मृतअवस्थेत मिळून आला. त्याचे उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिला.