

भंडारकवठे : भीमा नदी पात्रात उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भंडारकवठे, अरळी व औज-मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) येथील भीमा नदी पात्रावरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणी वाढल्याने विद्युत पंप काढताना शेतकर्यांची दिवसभर धांदल उडाली.
सध्या नदीपात्रात लाखाहून अधिक क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीपात्रातील पाणी वाढल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील महत्त्वाची असलेले तीनही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे, या बंधार्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने कर्नाटकशी असलेला संपर्क तुटला आहे. नदीकाठी शेकडो शेतकर्यांचे पाणी उपसा करणारे विद्युत पंप पाण्यात बुडण्याची शक्यता निर्माण झाल्याने ते काढण्यासाठी दिवसभर शेतकर्यांची दमछाक झाली.
भीमा नदी पात्रावरील बंधारे बुडाल्यामुळे कर्नाटकातील उमरज, गोविंदपूर, निवरगी, दसूर, शिरनाळ यासह अन्य गावांचा जिल्ह्यातील तेलगाव-भीमा, भंडारकवठे, औज-मंद्रुप येथील नागरिकांचा संपर्क सध्या तुटला आहे. प्रशासनाने शेतकर्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठी जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.