

बार्शी : सभासद, संचालकांच्या संमतीशिवाय कंपनीच्या स्थावर मालमत्तेवर परस्पर दोन कोटी, दहा लाख रुपयांचे बोगस कर्ज काढून त्या कर्जाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी पुणे व मुंबई येथील सातजणांवर बार्शी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नितन छटवाल (रा. अंधेरी, मुंबई), स्व. देविदास सजनानी, वनिता सजनानी, दीपा सजनानी, मार्कस थोरात, केशव इड्डा व विनीत तापडिया सर्व (रा. पुणे व मुंबई) अशी या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सीमा भाऊसाहेब आंधळकर (रा. सौंदरे, ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.
फर्यादीत म्हटले आहे की, रामगिरी शुगर लि. गुंजेवाडी, सावरगाव (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) चे मुख्य नोंदणीकृत कार्यालय शिवप्रभा बंगला, देशमुख प्लॉट उपळाई रोड बार्शी येथे आहे. या कार्यालयाच्या पत्त्यावर कंपनीची कर्जमागणीबाबत कोणतीही बैठक झाली नाही. अथवा कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्ज घेण्याबाबत विषय झालाआहे.
कंपनीच्या नावाच्या स्थावर मालमत्ता तारण ठेवण्याबाबत विषय नव्हता. असे असताना बनावट कागदपत्रे बनवून वित्तीय कंपनीला हाताशी धरून कंपनीच्या स्थावर मालमत्तेवर परस्पर दोन कोटी, दहा लाखांचे बोगस कर्ज काढून त्या कर्जाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणी मुंबईसह पुण्यातील असे एकूण सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.