

सांगोला : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीमध्ये सोबत आलेल्यांना घेऊन, अन्यथा न आलेल्यांना सलाम करून सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी भाजप सज्ज झाले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
छत्रपती शिवाजी चौक सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर कार्यकर्ते उद्योगपती बाळासाहेब एरंडे व उद्योगपती भाऊसाहेब रुपनर त्यांच्या सहकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. व्यासपीठावर आमदार सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सांवत, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राजश्रीताई नागणे -पाटील, शिवाजीराव गायकवाड, तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, भाऊसाहेब रुपनर, माजी सभापती बाळासाहेब काटकर आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गोरे म्हणाले की, रात्री-अपरात्री कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन पक्ष प्रवेश करणे थांबत नाही. तुम्ही कार्यकर्त्यांना किती दिवस थांबवणार आहात. पुन्हा पंधरा दिवसांत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन विद्यमान आमदारांना निवडणुकीच्या वेळी आम्ही मदत केली आहे. त्यांनी याची जाण ठेवावी. सोलापूर जिल्ह्यामधील अनेक नेते व कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचा प्रवेश थोड्याच दिवसात पाहावयाला मिळणार आहे. आज झालेल्या भाजप प्रवेशांमध्ये असंख्य कार्यकर्ते व नेत्यांनी प्रवेश केला. हा फक्त टेलर आहे. सांगोला तालुका हा भाजपमय केला जाईल. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या व पूर्वी असणाऱ्या सर्वांना योग्य सन्मान दिला जाईल. त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत.
महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचे मंत्रिपद आहे. माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत जे काय लागते, जो काय विकास करावा लागतो. ते सर्व माझ्या मंत्रालयाकडून मिळणार आहे. यामुळे सांगोला तालुक्यातीलच काय महाराष्ट्र मधील सर्व ठिकाणी सर्वसामान्य जनतेला उपयोगी असणाऱ्या सर्व योजना प्रभावीपणे राबवल्या जातील. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, राजश्रीताई नागणे पाटील, भाऊसाहेब रुपनर, बाळासाहेब एरंडे, बाळासाहेब काटकर, सचिन देशमुख, संभाजी आलदर, उल्हास धायगुडे, अशोक पवार, प्रशांत फुले, जुबेर मुजावर, पोपट गडदे यांनी आपले विचार मांडले.