

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दोन दिवस शिल्लक असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे नेते तथा माजी आ. दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळकेसह अनेक नेत्यांशी हातमिळवणी केली आहे. मात्र, आमदार विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख हे दोन्ही भाजपचे आमदार सर्वपक्षीय नेत्यांच्या आघाडीत दिसले नाहीत. त्यामुळे ते स्वतंत्र पॅनल उभा करणार का, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.
बाजार समिती निवडणुकीसाठी चारशेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. आ. कल्याणशेट्टी, माजी आ. माने, हसापुरे, बळीराम साठे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे यांच्यासह विविध नेते एकत्रित येऊन भाजप पुरस्कृत पॅनल उभा करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही देशमुखांचा समावेश नसल्याने भाजप विरोध भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय नेत्यांमध्ये निवडणूक लागण्याची शक्यता आहे. परंतु आ. कल्याणशेट्टी यांनी दोन्ही देशमुखांना विश्वासात घेऊन पॅनलची घोषणा करणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे आ. सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनिष देशमुख यांना सर्वपक्षीय नेत्यांच्या गटात संचालक पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आ. सुभाष देशमुख यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय नेत्यांच्या विरोधात भाजपचा पॅनल उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसची मोठी ताकद आहे. बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता आल्यास बाजार समिती ही राष्ट्रीय बाजार समिती करण्यात येईल, असा इशारा भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिल्याची चर्चा आहे. निवडणूक जिंकण्याची ताकद असूनही काँग्रेसचे नेते भाजपच्या वळचणीस गेले आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. सचिन कल्याणशेट्टी हे सर्वपक्षीय नेत्यांसोबत पॅनल उभा करण्याची गोष्ट मला माहित नाही. मी बाहेर असून, सोलापुरात आल्यानंतर आ. कल्याणशेट्टी यांच्याशी चर्चा करुन सांगेन.
सुभाष देशमुख, आमदार, भाजप