

भवानीनगर : ज्ञानोबा - तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे शनिवारी (दि. 28) सकाळी भक्तिमय वातावरणात पार पडले.
ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात शनिवारी सकाळी साडेसात वाजता सर्व दिंड्या व पालखी सोहळा रिंगण स्थळावर दाखल झाल्या. सुरुवातीला अक्षय मचाले यांच्या मेंढ्यांचे रिंगण पार पडले. त्यानंतर भगव्या पताका घेतलेले वारकरी डोक्यावर हंडा व तुळस घेतलेल्या महिला वारकर्यांनी, विणेकर्यांनी पालखीभोवती प्रदक्षिणा घातली. त्यानंतर पालखीचे मानाचे अश्व व मोहिते पाटलांचे अश्व रिंगणामध्ये दाखल झाले. अश्वांचे पूजन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर अश्वांच्या रिंगणाला सुरुवात झाली.
ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषमध्ये मानाच्या अश्वाने पालखीला तीन प्रदक्षिणा पूर्ण करून पालखीचे दर्शन घेतले व डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पार पडला. रिंगण सोहळ्यानंतर अश्वाची चरणधुली घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. हा सोहळा सुमारे एक तासापर्यंत चालला. पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण पार पडल्यानंतर पालखी बेलवाडी येथील मारुती मंदिरामध्ये नेण्यात आली. मारुती मंदिरामध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला. रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.
दरम्यान, सणसर येथील मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शनिवारी सकाळी सात वाजता सणसर येथून निमगाव केतकी येथील मुक्कामाकडे प्रस्थान ठेवले. जाचकवस्ती खाराओढा येथून पालखी सोहळा बेलवाडी येथे पोहोचला. पालखी सोहळा बेलवाडी येथे आल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.