

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्यांची आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हितासाठी माजी आ. दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे यांच्यासह इतर नेते एकत्रित येत आहोत, अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दोन दिवस शिल्लक असतानाच सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी दि. 14 शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार घेतली. त्यावेळी आ. कल्याणशेट्टी यांनी माहिती दिली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, माजी आ. माने, शहाजी पवार, हसापुरे, शेळके, शिवदारे, श्रीशैल नरोळे, अविनाश महागांवकर उपस्थित होते.
आ. कल्याणशेट्टी म्हणाले, शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन सर्व पक्ष बाजूला ठेवले आहे. दोन दिवसात सर्व उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची विनंती करणार आहे. एक अर्ज ही राहिला तर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राधान्याने निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न राहणार आहे. अन्यथा सर्वपक्षीय नेत्यांचे पॅनल बुधवारी दि. 16 जाहीर करण्यात येतील. त्याअगोदर आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख नेत्यांशी चर्चा करुनच निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनल उभा करू. त्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे. त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढणार असल्याचे आ. कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
सहकारात कोणताही पक्ष नसतो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांनी एकत्रित येऊन बाजार समितीवर सत्ता स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आ. कल्याणशेट्टींच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीची निवडणूक लढणार असल्याचे माजी आ. माने सांगितले.