

सोलापूर : राज्यातील महिलांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सक्षमीकरणासाठी महिला व बाल विकास विभागाने आदिशक्ती अभियान राबवणार आहे. आदिशक्ती अभियानातून उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायतींना 25 हजार ते 10 लाखांपर्यंत पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामुळे आदिशक्ती अभियानातून ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी मिळणार आहे. तसेच महिलांचे सक्षमीकरण होणार आहे.
आदिशक्ती अभियानाद्वारे हुंडा आणि बालविवाह यासारख्या अनिष्ट प्रथांचे समूळ उच्चाटन केले जाणार आहे. एकल महिला, विधवा, परित्यक्ता यांच्यासाठी संरक्षण आणि मदतीची यंत्रणा उभारली जाणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनास चालना देण्यासाठी आयटीआय आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महिलांना कायद्याचे ज्ञान मिळावे, यासाठी कायदे, योजना आणि अधिकाराविषयी आदिशक्ती अभियानातून जनजागृती केली जाणार आहे. मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी आदिशक्ती अभियानाची समिती काम करणार आहे. तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन ग्रामपंचायतीकडून केले जाणार आहे. त्यावर आदिशक्ती अभियानातून समितीचा वॉच राहणार आहे.
उत्कृष्ट कार्य करणार्यांना पुरस्कार
तालुकास्तर : प्रथम क्रमांक एक लाख रुपये, द्वितीय 50 हजार, तृतीय 25 हजार रुपये.
जिल्हास्तर : प्रथम पाच लाख, द्वितीय तीन लाख, तृतीय एक लाख रुपये,
राज्यस्तर : प्रथम 10 लाख, द्वितीय सात लाख, तृतीय पाच लाख रुपये.