पोखरापूर : मोहोळ शहरातील एका शाळेतील अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे अमिष दाखवत विनयभंक केल्याची घटना गुरूवारी (दि.29) घडली. यावेळी तरूणाने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत बदनामी करण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग केला.
याबाबत पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरातील एका शाळेतील विद्यार्थिनीच्या मागे तिच्याच गल्लीत राहणारा अजमेर मोहंम्मद शेख (वय 24) तिचा पाठलाग करत होता. तो सतत तिला माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी तू लग्न कर असं म्हणत होता. मात्र, अल्पवयीन मुलगी त्याला नकार देत होती.
काल (दि.29) अजमेर चारचाकी वाहन घेवून शाळेत आला. यावेळी त्याने अल्पवयीन मुलीला आपण बाहेर फिरून येऊ असे म्हणत गाडीत बसायला सांगितले. त्यावेळी तिने एकटीने गाडीत बसायला नकार दिला. यानंतर ती आपल्या इतर मैत्रिणीसोबत गाडीत बसायला तयार झाली. त्यावेळी तिच्या अल्पवयीन मैत्रिणीने तिच्या गल्लीतील अल्पवयीन दोन मुलांना सोबत घेतले.
यानंतर तो अल्पवयीन मुला-मुलींना सोलापूर येथे एका हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला. तसेच मॉलमध्ये फिरवले. त्यावेळी तरुणाने अल्पवयीन मुलीला चॉकलेट मोबाईल घेऊन दिला व माझे तुझ्यावर प्रेम आहे. असे सांगत होता. यापुढे तो म्हणाला की, मी तुझ्याशी लग्न करीन. तू जर नकार दिलास, तर तुझे बाहेर अफेअर आहे असे सांगून तुझी बदनामी करेन.
सोलापूरहून येताना सावळेश्वर टोल नाक्याजवळील पेट्रोल पंपाजवळ गाडीतील इतर एक मुलगी व दोन मुलांना अजमेरने मला तिच्याशी बोलायचे आहे असे सांगत गाडीतून खाली उतरायला सांगितले. त्यावेळी तिघे गाडीतून खाली उतरल्यानंतर तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यावेळी अल्पवयीन मुलीने इतर मुलांना आवाज देत बोलावून गेले.
त्यादरम्यान मुली शाळेत नसल्याचे पालकांना समजले. पालक शाळेत गेले व त्या ठिकाणी मुले नाहीत म्हणून सर्वत्र शोध सुरू केला. दरम्यान पाच वाजण्याच्या सुमारास अजमेर चार चाकी गाडी घेऊन शाळेजवळ मुलांना सोडायला आला होता. यावेळी काही पालकांनी अजमेरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजमेर शेख याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर करीत आहेत.